बँकेचा वैभवशाली इतिहास
शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे शिक्षक हे समाजाचे शिल्पकार असतात. पिढ्यानपिढ्या घडवणाऱ्या या शिक्षकांच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित आर्थिक भक्कमता देण्यासाठी 'सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि., सांगली' गेली अनेक वर्षे अविरतपणे कार्यरत आहे.
केवळ एक बँक म्हणून नाही, तर सर्व शिक्षक बांधवांच्या सुख-दुःखात धावून जाणारी 'आपली बँक' म्हणून संस्थेने देशात सहकारातील एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
आमचा गौरवशाली वारसा आणि ध्येय
प्राथमिक शिक्षकांच्या एकत्र येण्यातून आणि सहकाराच्या भावनेतून या बँकेची पायाभरणी झाली. शिक्षकांच्या आर्थिक गरजा वेळेवर पूर्ण करणे, त्यांच्या बचतीला योग्य परतावा देणे आणि त्यांच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे हेच बँकेचे मुख्य ध्येय आहे. पारदर्शकता, सभासद हित आणि गतिमान सेवा या त्रिसूत्रीवर बँकेचा कारभार चालतो.
प्राथमिक शिक्षकांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करून त्यांची आणि त्यांच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या हेतूने बँकेची सन १९५२ साली मसूर ता. कराड, जि. सातारा येथे स्थापना झाली. सातारा जिल्ह्याची विभागणी झालेनंतर दि. ०४/११/१९५२ रोजी आपली बँक दक्षिण सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक होऊन स्वतंत्र कारभार पाहू लागली. सांगली जिल्ह्याच्या निर्मितीनंतर सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक म्हणून नावारूपास आली. आज महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक बँकांत अग्रेसर म्हणून सेवा देत असलेली आमची बँक आहे. तसेच महाराष्ट्रातील पगारदार बँकांत सर्वोत्कृष्ट बँक म्हणून प्रथम पुरस्कार प्राप्त बँक आहे.
आमच्या बँकेने बँकिंगमधील सहकाराचे तत्त्व अवलंबून प्राथमिक शिक्षकांबरोबरच सर्वसाधारण लोकांपर्यंत बँकिंग राबविण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. ते आम्ही मोठ्या प्रमाणात पूर्ण सुद्धा केलेले आहे. सध्या नवीन तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा आणि उत्कृष्ट ग्राहक सेवेचा वापर करून आमची बँक महाराष्ट्रातील एक मोठी पगारदार नोकरांची सहकारी बँक म्हणून विकसित होत आहे.
जिल्हा सांगली बरोबरच सोलापूर, सातारा व रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये बँकेच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका कडील प्राथमिक शिक्षकांपैकी बँकेचे ६,५८१ सभासद (दि. ३१ मार्च, २०२६ अखेर) आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये तालुकावार शाखा आटपाडी, कवठे महांकाळ, जत, शिराळा, तासगांव, ईश्वरपूर, मिरज, विटा, पलूस, कडेगांव व सांगली तसेच ग्रामीण भागात आष्टा, आरग, भिलवडी, सावळज, संख व उमदी व सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर येथेही शाखा आहेत.
आमचे ध्येय
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड; ही महाराष्ट्रातील एक गतिशील, परिपूर्ण सेवा देणारी अग्रणी सहकारी बँक आहे, जी सभासद व ठेवीदार यांना सुरक्षिततेच्या चौकटीत ठेवून त्यांच्या आर्थिक हितासाठी काम करत आहे. आम्ही आमच्या सेवांद्वारे प्राथमिक शिक्षकांच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील आहोत.
पुरस्कार व मान्यता
🏆 'अ' वर्ग ऑडीट वर्गीकरण : बँकेला स्थापनेपासून सातत्याने ऑडीट वर्ग सतत "अ" राखलेला आहे.
🏆 प्रथम पुरस्कार : महाराष्ट्रातील पगारदार नोकरांच्या बँकांमध्ये सर्वोत्कृष्ट बँक म्हणून प्रथम पुरस्कार प्राप्त बँक.
🏆 100% कर्जवसुली सन्मान : 100% कर्जवसुली असणारी पगारदार नोकरांची एकमेव नागरी सहकारी बँक.